बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात   

पुणे : ‘जय जिजाऊ’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत आणि रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून बालकुमार चित्रपट महोत्सवाचा गुरूवारी सुरूवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाद्वारे मुलांनी वीरश्रीची अनुभूती घेतली.
 
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिलपर्यंत कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट गृहात बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर, प्रकाश चाफळकर, कावरे आईस्क्रीमचे राजू कावरे, जान्हवी कावरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. या महोत्सवात लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेले पाच चित्रपट दाखविण्यात येत असल्याने त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. महोत्सवाचे यंदाचे २७वे वर्ष आहे.
 
 दिग्पाल लांजेकर म्हणाले, लहानपणापासून मी हा बालचित्रपट महोत्सव अनुभवला आहे. सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करणे कठीण आहे. परंतु आम्हा बालगोपाळांना या चित्रपट महोत्सवातून उत्तमोत्तम चित्रपट दरवर्षी पहायला मिळत गेले आणि त्यातूचन माझ्यातील कलावंत-दिग्दर्शक घडला. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. आज (शुक्रवारी) ‘पावनखिंड’, शनिवारी, ‘फर्जंद’, रविवारी ‘फत्तेशिकस्त’ सोमवारी ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ मंगळवारी ‘तेंडल्या’ बुधवारी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हे चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत. समारोप समारंभास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, कृष्णकुमार गोयल, प्रवीण बढेकर, अरविंद चाफळकर तसेच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातील कलावंत उपस्थिती असणार आहे.
 

Related Articles